कॉलेजमध्ये जाताना रस्त्यात अडवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना शिक्षा

10 वर्ष सश्रम कारावास, 2.74 लाखांचा दंड

गडचिरोली : आपल्या गावावरून कुरखेडा येथील कॅालेजमध्ये सायकलने जात असताना तरुणीला रस्त्यात अडवून दोघांनी जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरी केली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम.मुधोळकर यांनी विविध कलमान्वये 10 वर्ष सश्रम कारावास आणि एकूण 2.74 लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश देण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, पीडित युवती (23 वर्ष) ही 3 मार्च 2018 रोजी आपल्या गावारून सकाळी 11 वाजता कॉलेजमध्ये कुरखेडा येथे सायकलने जात होता. यावेळी बेलगाव ते नवरगाव दरम्यान आरोपी प्रशांत उमाजी जोगे (32 वर्ष) आणि रविंद्र सुमराज मडावी (25 वर्ष) यांनी त्या युवतीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर तोंड दाबुन तिला दुचाकीवर बसवुन जंगलाच्या भागात कच्या रस्त्याने नेऊन दोघांनीही तिच्यावर बळजबरी केली. त्यांना प्रतिकार केला असता पिडीतेला टोकदार वस्तुने टोचुन जखमी केले. एवढ्यावरच ते थांबले नाही तर तिला मारहाण करत आई-वडीलांना सांगितले तर तुला व तुझ्या आई-वडीलांना ठार मारुन टाकीन, अशी धमकीही दिली. त्यानंतर पीडित युवती त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटून रस्त्यावर येऊन एका अनोळखी मुलीच्या सहाय्याने आपल्या घरी पोहोचली.

त्या युवतीने आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यावरून दोन्ही आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कलमानुसार वेगवेगळी शिक्षा आणि दंड ठोठावला. सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायची असल्याने आरोपींना कमाल 10 वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस.प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास कुरखेडा ठाण्याचे सहा.पोनि.गजानन पडळकर व पोउपनि.विजय वनकर यांनी केला.