गडचिरोली : चामोर्शी ते घोट असा दुचाकीने नेहमी प्रवास करणाऱ्या महिलेवर पाळत ठेवून तिला रस्त्यात अडवत जबरीने रोख रक्कम पळविणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारावर शोध घेऊन अटक केली. विशेष म्हणजे या महिलेकडील रोख रकमेची त्याच चोरट्यांनी अडीच महिन्याच्या फरकाने दुसऱ्यांदा जबरी चोरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.19 जून 2025 रोजी फिर्यादी महिला प्रिया विकास मंडल ही आपल्या दुचाकी वाहनाने चामोर्शी ते घोट असा प्रवास करीत असताना घोटपासून 2 किमी अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ दोन अनोळखी दुचाकीस्वार इसमांनी महिलेच्या पाठीवर लटकवलेली 1,25,039 रुपये असलेली बॅग हिसकावून जंगलाच्या दिशेने पळ काढला होता. प्रिया मंडल यांच्या तोंडी तक्रारीवरून घोट पोलीस मदत केंद्रात कलम 304 (2), 3 (5) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दि.5 सप्टेंबर 2025 रोजी उषा मंडल आपल्या दुचाकी वाहनाने गणपूर ते अड्याळकडून चामोर्शीकडे जात असताना गणपूरपासून अंदाजे 2 किमी अंतरावर दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी त्यांच्या पाठीवर असलेली 1,34,064 रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पुन्हा मंडल यांनी चामोर्शी पोलिसात तक्रार दाखल केली.
एकाच महिलेसोबत दोन वेळा जबरी चोरी घडल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी येथील अधिकारी व अंमलदारांची अशी दोन पथके तयार करण्यात आली होती. या दोन्ही पथकांनी समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने सदर गुन्ह्रातील आरोपींचा शिताफीने शोध घेऊन आरोपी शशांक संजय दुर्गे (27 वर्षे) आणि राजा तोताराम कोरडे (25 वर्षे), दोघेही रा.मलेझरी, ता.मुलचेरा यांना ताब्यात घेतले. त्या दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली.
दोन्ही गुन्ह्यात जबरीने चोरलेली रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या आरोपींनी अशाच पद्धतीने आणखी कोणाला लुटले का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पुढील तपास चामोर्शी ठाण्याचे सपोनि.सुमित बनसोडे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.भगतसिंग दुलत, पोहवा. सतीश कत्तीवार, नापोअं धनंजय चौधरी, पोअं राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, चापोअं दीपक लोणारे यांनी केली.