आत्मसमर्पण केलेल्या ‘त्या’ जहाल महिला नक्षलवाद्यांवर तब्बल 47 गुन्ह्यांची नोंद

म्हणून होते प्रत्येकी आठ लाखांचे ईनाम

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गुरूवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर चकमक, जाळपोळ, हत्या अशा गंभीर गुन्ह्यांसह इतर असे एकूण 47 गुन्हे दाखल आहेत. दोघीही नक्षलवाद्यांच्या पुरवठा विभागात कार्यरत होत्या. राज्य शासनाने त्यांच्यावर प्रत्येकी 8 लाखांचे इनाम ठेवलेले होते. त्यांच्या आत्मसमर्पणसाठी गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे प्रयत्न केले.

प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई (36 वर्ष, प्लाटून पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम) रा.बोगाटोला (गजामेंढी), ता.धानोरा आणि अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, (34 वर्ष, प्लाटून पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम) रा. मरकेगाव ता.धानोरा, जि.गडचिरोली अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. प्रमिला ही 2005 मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाली होती. तिच्यावर एकूण 40 गुन्हे दाखल असून तिने कुरखेडा, कोरची, देवली दलममध्ये काम केले आहे. अखिला ही 2010 मध्ये टिपागड दलममध्ये दाखल झाली होती. वेगवेगळी जबाबदारी सांभाळताना तिच्यावरही 7 गुन्हे दाखल आहेत.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून प्रमिला बोगा ऊर्फ मंजूबाई हिला एकुण 5 लाख रुपये आणि अखिला पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

हे आत्मसमर्पण घडवून आणण्याची कारवाई पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पो.उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पो.अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 113 बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 668 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.