गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गिरीधर आणि डिव्हीजन कमिटी मेंबर संगिता या दाम्पत्याने गेल्या आठवड्यात आत्मसमर्पण केल्यानंतर आज नक्षलवाद्यांच्या कंपनी क्र.10 च्या दोन महिला सेक्शन कमांडरनी आत्मसमर्पण केले.
बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरिना नरोटे (28 वर्ष, रा.झारेवाडा, ता.एटापल्ली) आणि शशिकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके (29 वर्षे, रा.कटेझरी ता.धानोरा) अशी आत्मसमर्पण केलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. त्या दोघींवरही राज्य शासनाने प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बाली ही 2010 मध्ये, तर शशिकला ही 2011 साली नक्षल दलममध्ये दाखल झाली होती. त्या दोघींनाही बक्षीस म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये मिळणार आहेत.
बाली ऊर्फ रामबत्तीवर आहेत 21 गुन्हे
सन 2010 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर ती भरती झाली. सन 2010 च्या शेवटी अहेरी दलममध्ये बदली होऊन गेली. सन 2016 मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र.10 मध्ये तिची बदली झाली. सन 2021 मध्ये पीपीसीएम / एसीएम (प्लाटून पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य) म्हणून बढती मिळाल्यानंतर आजपर्यंत त्या पदावर कार्यरत होती. या कार्यकाळात तिच्यावर एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 10 चकमकी, 1 जाळपोळ, 1 अपहरण आणि 9 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
शशीकला ऊर्फ चंद्रकलावर 8 गुन्ह्यांची नोंद
सन 2011 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झालेल्या शशिकलाची सन 2013 मध्ये टिपागड दलममधून कंपनी क्र.4 मध्ये बदली झाली. सन 2021 मध्ये कंपनी क्र.4 मधून कंपनी 10 मध्ये बदली झाली. सन 2023 मध्ये पीपीसीएम / एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य / एरीया कमिटी सदस्य) या पदावर बढती होऊन त्या पदावर आजपर्यंत ती कार्यरत होती. या कार्यकाळात तिच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 6 चकमकी व 2 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 या वर्षादरम्यान आतापर्यंत 19 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. हे आत्मसमर्पण घडवून नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलनिरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मार्गदर्शन केले.
विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास ईच्छुक असतील त्यांना लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.