सिरोंचा : तालुक्यातील असरअल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेगवेगळ्या गावात जेमतेम 15 तासांच्या अंतराने एका युवतीसह युवकाने आपापल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यातील युवकाच्या आत्महत्येचे कारण समोर आले, मात्र युवतीच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे.
आएशा कलीम शेख (18 वर्ष) रा.टेकडा मोटला आणि राजू गंगाराम जेंगठे (20 वर्ष) रा.असरअली अशी मृत युवक-युवतीची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत (दि.9) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास टेकडा मोटला गावातील आएशा कलीम शेख या युवतीने स्वत:च्या घरात गळफास लावून घेतला. तिला आई नाही. वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर मोठा भाऊ तेलंगणात होता. दुपारी ती आपल्या मैत्रिणींसोबत फोटो काढण्यासाठी सोमनपल्ली भागात गेली होती अशी चर्चा आहे. सायंकाळी तिने वडीलांना फोन करून आपल्यासाठी चिकन राईस आणण्यास सांगितले होते. पण अचानक असे काय घडले की तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे. शवपरिक्षण अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या घटनेत असरअली येथील राजू जेंगठे या युवकाने शुक्रवारी सकाळी आपल्या घरात गळफास लावून घेतला. तो शेतीची कामे करतो. सकाळी त्याचे आई-वडीलांसोबत भांडण झाले होते. त्यानंतर आई-वडील शेतात निघून गेले. घरी एकटाच असलेल्या राजूने त्याच रागात स्वत:ची जीवनयात्रा संपवली.
या दोन्ही घटना असरअल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि अवघ्या 15 तासांच्या अंतराने घडल्याने त्या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, अशी चर्चा परिसरात सुरू होती. मात्र दोन्ही घटना वेगवेगळ्या असून त्यामागील कारणेही वेगवेगळी असल्याचे असरअल्ली ठाण्याचे प्रभारी योगीराज जाधव यांनी सांगितले.
































