पैशाच्या वादातून युवतीची गळा आवळून हत्या, काही तासात आरोपीला अटक

रात्री घरून गेली, सकाळी दिसला मृतदेह

कुरखेडा : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारालगत शनिवारी सकाळी एका युवतीचा मृतदेह आढळला होता. अंगावर कोणतीही जखम नसल्याने तिचा मृ्त्यू नेमका कशाने झाला हे शोधण्याचे आव्हान होते. शवपरिक्षणात तिची गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न होताच कुरखेडा पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. पैशाच्या वादातून तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

ज्योती उर्फ चांदणी मसाजी मेश्राम (23 वर्ष) असे मृत युवतीचे नाव असून इकराम सलाम शेख (30 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. चांदनीच्या घरी आई, भाऊ आणि एक गतीमंद मुलगी असते. शुक्रवारच्या रात्री 10.30 च्या दरम्यान ती घराबाहेर गेली होती. पण ती परत आलीच नाही. त्यामुळे घरच्या लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून चांदणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवपरिक्षणासाठी पाठविला. या घटनेचे गांभिर्य पाहून कुरखेडा पोलिसांनी तीव्र गतीने तपासचक्रे फिरवली. चांदनीच्या मोबाईलमधील शेवटचे कॅाल तपासण्यात आले. त्यावरून संशयित आरोपी म्हणून इकराम शेख याला ताब्यात घेतले. यादरम्यान डॅाक्टरांनी चांदणीची हत्या झाल्याचे स्पष्ट करताच पोलिसांनी इकरामला बोलते केले. त्याने जुन्या पैश्याच्या वादातून चांदणीचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी इकराम याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांचा विषय गाजत असल्याने हा त्यातला प्रकार तर नाही, या शंकेने अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम.रमेश सकाळीच कुरखेडा येथे दाखल झाले होते. आरोपीने त्या युवतीला एका प्रकरणात मदत केली होती. तेव्हापासून त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती, अशी माहिती आहे. मात्र केवळ पैशाच्या वादातून आरोपीने त्या युवतीचा जीव घेतला की आणखी काही कारण आहे, याचा सखोल तपास केला जाणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कुरखेडाचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.