गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात, म्हणजे 1 जूनपासून 15 सप्टेंबरपर्यंत 1305 मिमी पाऊस बरसला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 1254 मिमी पाऊस पडतो. ती सरासरी 15 दिवस आधीच ओलांडल्या गेली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात होतो, पण यावर्षी देसाईगंजने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सिरोंचा तालुक्यावर पावसाची अवकृपा झाली आहे. देसाईगंजच्या तुलनेत या तालुक्यात निम्माच पाऊस पडला आहे.
विशेष म्हणजे पावसाने यावर्षी मोठा खंड दिला न देता वेळोवेळी हजेरी लावली. पिकांना पोषक पाऊस झाल्याने धान, कापूस या पिकांची स्थिती चांगली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत जिल्ह्यात 1537 मिमी पाऊस बरसला होता. त्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी योग्य वेळी पाऊस झाल्याने पिकांना तो पोषक ठरला आहे.
पावसाचे आणखी 15 दिवस बाकी आहेत.
कोणत्या तालुक्यात किती बरसला?
गडचिरोली – 1235 मिमी
धानोरा – 1424 मिमी
देसाईगंज – 1672 मिमी
आरमोरी – 1128 मिमी
कुरखेडा – 1435 मिमी
कोरची – 1330 मिमी
चामोर्शी – 1035 मिमी
मुलचेरा – 1375 मिमी
अहेरी – 1177 मिमी
सिरोंचा – 891 मिमी
एटापल्ली – 1410 मिमी
भामरागड – 1555 मिमी