गडचिरोली : ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ आज (दि.17) सुरू करण्यात येत आहे गडचिरोली तालुक्यातील दिभना ग्रामपंचायतमध्ये त्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दि.17 सप्टेंबर ते 2 आॅक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर 5 लाख ते 5 कोटी रुपयांच्या प्रथम पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
अभियानाचे उद्दिष्ट आणि मुख्य घटक
हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवले जाणार आहे. या कालावधीत, खालील आठ मुख्य घटकांवर केलेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. त्यात
* सुशासनयुक्त पंचायतराज : लोकाभिमुख आणि सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे.
* सक्षम पंचायत : स्वनिधी, सीएसआर आणि लोकवर्गणीतून पंचायतराज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
* जल समृद्धी, स्वच्छ व हरित गाव : गावांमध्ये जलसंवर्धन, स्वच्छता आणि हरित वातावरण निर्माण करणे.
* मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आणि इतर योजनांचा प्रभावी वापर करणे.
* गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण : गावातील विविध संस्थांना अधिक बळकट करणे.
* उपजीविका विकास, सामाजिक न्याय : उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणे.
* लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ : लोकांच्या सहभागातून आणि श्रमदानातून गावाच्या विकासासाठी चळवळ उभी करणे.
* नाविन्यपूर्ण उपक्रम : अभिनव कल्पना आणि उपक्रम राबवणे.
मूल्यमापन आणि निवड प्रक्रिया
या अभियानासाठी गटविकास अधिकारी त्यांच्या तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करतील. ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या स्वमूल्यांकन प्रस्तावांचे तालुकास्तरीय समितीमार्फत मूल्यांकन केले जाईल, त्यानंतर जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर निवड प्रक्रिया पार पडेल. तालुकास्तरीय मूल्यांकन : 11 ते 26 जानेवारी, जिल्हास्तरीय मूल्यांकन 28 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, विभागस्तरीय मूल्यांकन : 17 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि राज्यस्तरीय मूल्यांकन संपूर्ण मार्च महिन्यात होईल.
गावाच्या विकासासाठी अभियानात सहभाग घ्या- गाडे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’च्या माध्यमातून मिळणाऱ्या बक्षिसासोबतच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामस्थाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
सेवा पंधरवड्यातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा- जिल्हाधिकारी
महसूल विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवून या पंधरवड्यात शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानांतर्गत तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये प्रामुख्याने पांदन रस्ते मोहीम, सर्वांसाठी घरे व पट्टे वाटप मोहीम, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.
पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर)– पांदन रस्ते मोहीम : या टप्प्यात पांदद/शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गाव नकाशावर चिन्हांकित करणे व त्यांची नोंद करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी “रस्ता अदालत” आयोजित करण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर)– सर्वांसाठी घरे व पट्टे वाटप मोहीम : या टप्प्यात “सर्वांसाठी घरे” या उपक्रमांतर्गत उपलब्ध शासकीय जमिनींचे घरकुलासाठी पट्टे वाटप केले जाणार आहेत. त्याचबरोबर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत.
तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर)– नावीन्यपूर्ण उपक्रम : या टप्प्यात शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमिसाईल आदी दाखले वितरित केले जाणार आहेत. तसेच “लक्ष्मी मुक्ती योजना” अंतर्गत महिलांची नावे घरातील मालमत्तेत समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यासोबतच एकाच सातबाऱ्यावर असलेल्या अनेक नावांची फोड करून मागणीनुसार वेगवगळे सातबारे तयार करून देण्यात येणार आहे.