गडचिरोली : ‘काळ आला होता, पण वेळ नाही’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय देणारी घटना परवा कुरखेडा तालुक्यातल्या कढोली नाल्यावर घडली. नाल्याचे पाणी पुलावरून वाहात असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात एक 60 वर्षीय इसम पुराच्या प्रवाहासोबत वाहून गेला. पण नशिब बलवत्तर म्हणून एक झाड हाताला लागले आणि तेच त्याच्यासाठी जीवनदाता ठरले. अखेर दोरखंडाच्या सहाय्याने त्याला पुरातून बाहेर काढण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार, सोनेरांगी या गावातील हरिदास बावनथडे हा इसम आपल्या गावी येण्यासाठी निघाला होता. पण कढोली नाल्यावरच्या पुलावरून पाणी होते. हळूहळू पुढे सरकत त्याने पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखल आणि प्रवाहाच्या वेगाने तो घसरून पाण्यात पडला. नंतर सावरणे कठीण झाल्याने तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. काही अंतरावर नदीपात्रातील एक झाड त्याच्या हाती लागले. प्रसंगावधान राखत त्याने झाडाला घट्ट पकडून ठेवले.
हे दृष्य नदीच्या दुसऱ्या तिरावर असलेले काही लोक पाहात होते. त्यांनी सोनेरांगी गावात येऊन ही बातमी सांगताच सोनेरांगीचे सरपंच बाबुराव कोहळे, पोलीस पाटील रुपेश नारनवरे, मोहन मडावी, अक्षय रणदिवे व इतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने दोन तासानंतर हरिदासला बाहेर काढण्यात यश आले. या प्रसंगाचा थरारत व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.