गोविंदपूरच्या 111 वर्षाच्या आजीचे केंद्रावरील मतदान ठरले प्रेरणादायी

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार

मुलचेरा : मतदानाचा उत्साह तरुणांमध्येच नाही तर म्हाताऱ्या लोकांमध्येही होता. मुलचेरा तालुक्यातल्या गोविंदपूर या बंगाली वसाहतीमधील 111 वर्षांच्या फुलमती बिनोद सरकार या आजीबाईने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी या आजीबाईचा उत्साह इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांचा सत्कार केला.

फुलमती सरकार यांचा जन्म 1 जानेवारी 1913 रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हिलचेअरची व्यवस्था केली होती. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्यांना 111 वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रशासनाने शाल-श्रीफळ देऊन केले स्वागत

फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी, गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले. त्यानंतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती सरकार यांना शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे, पुरवठा अधिकारी इंगोले, तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाकाळात लसीकरणातही पुढाकार

फुलमती सरकार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले होते. एवढेच काय तर देशावर कोरोना महामारीचे संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते.