स्पर्धा परीक्षांच्या सराव पेपरमध्ये 42 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

आातापर्यंत 12 टेस्ट सिरिज पूर्ण

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या ‘एक गाव एक वाचनालय’ या उपक्रमांतर्गत युवा वर्गाला स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या सराव पेपरच्या मालिकेतील 12 वा सराव पेपर घेण्यात आला. त्यात जिल्हाभरात 4300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आतापर्यंत झालेल्या एकूण 12 सराव पेपरमध्ये 42 हजार 50 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अतिदुर्गम भागातील गर्देवाडाच्या भगवान बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयातही 8 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव असतो. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा, तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांच्या सराव परीक्षेची मालिका घेतली जात आहे.

दि.17 जानेवारी रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृह, तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनपासून, पोलीस मदत केंद्रापर्यंत उभारण्यात आलेल्या 74 वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र.12 चे आयोजन केले होते.

विविध परीक्षेसाठी ठरणार उपयोगी

या सराव पेपरचा उपयोग विद्यार्थ्याना पोलीस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता होणार आहे. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा हद्दीतील 12, पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील 15 व पोस्टे वांगेतुरी हद्दीतील 15 विद्यार्थ्यांनी या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. तसेच ‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत दि. 9 डिसेंबर 2025 रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय, गर्देवाडा येथे घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत 8 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. पोलीस मुख्यालय परिसरात घेण्यात आलेल्या सराव पेपरमध्ये 2553 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.