गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 17 जणांनी जीव गमावला आहे. त्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या पुरात बुडून 12 जण, तर वीज पडून 5 जण दगावले. याशिवाय 18 हजार 792 शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर 800 पेक्षा जास्त घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे.
सर्वाधिक 7 मृत्यू भामरागड तालुक्यात झाले आहेत. हे सर्व मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाले आहेत. याशिवाय चामोर्शी, धानोरा, कोरची, अहेरी तालुक्यात प्रत्येकी 2 जणांचा, तर सिरोंचा आणि आरमोरी तालुक्यात प्रत्येकी एका जणाने नैसर्गिक आपत्तीत जीव गमावला आहे. पूरपरिस्थिती आणि वीज पडून ज्या 17 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 7 जणांच्या कुटुंबियांना नियमानुसार शासकीय मदत देण्यात आली. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी 10 जणांच्या कुटुंबियांना अद्याप मदत मिळालेली नाही.
जुलै महिन्यातील पाऊस शेतीसाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरला. या महिन्यात 16 हजार 479 शेतकऱ्यांचे 9772 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय आॅगस्ट महिन्यात 2313 शेतकऱ्यांचे 1771 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतीचे सर्वाधिक नुकसान आरमोरी तालुक्यात झाले आहे.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 1314.9 मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी मे महिन्याच्या अखेरपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. जूनमध्ये काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी नियमित सुरू आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान झाले आहे.