कुपोषणाविरुद्ध गडचिरोलीत ‘गिफ्टमिल्क’चा यशस्वी प्रयोग

20 हजार विद्यार्थ्यांच्या लाभ

गडचिरोली : जिल्ह्यातील हजारो मुलांना रोज मिळणाऱ्या पौष्टिक दुधामुळे त्यांचे आरोग्य व आयुष्य सकारात्मक दिशेने बदलत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या ‘गिफ्टमिल्क’ कार्यक्रमामुळे कुपोषणाशी लढा सोपा झाला असून शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाला चालना मिळाली आहे.

हा उपक्रम माझगाव डॉक लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या ‘फाऊंडेशन फॉर न्यूट्रिशन’च्या माध्यमातून हाती घेतला आहे. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दररोज 200 मिली फ्लेव्हरयुक्त दूध दिले जात आहे. 5 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण कमी करण्याबरोबरच शाळेत हजेरी वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मागील वर्षी धानोरा, कुरखेडा, देसाईगंज व कोरची तालुक्यातील 472 शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. यातून इयत्ता पहिली ते पाचवीच्या 16 हजार 618 आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या 4 हजार 170 अशा एकूण 20 हजार 888 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळाला. यावर्षी हा उपक्रम आरमोरी तालुक्यातील 124 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. सप्टेंबरपासून 9 हजार 337 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

शालेय प्रशासन व पालकांच्या मते या योजनेमुळे मुलांची आरोग्यस्थिती सुधारली असून शाळेत नियमित उपस्थिती वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात तो राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेली माझगाव डॉक लिमिटेड ही जहाजबांधणी कंपनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. ‘गिफ्टमिल्क’ हा त्यांचा गडचिरोलीसाठीचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.