आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमात 20 युवकांना संधी

लखनौसाठी झाले रवाना

विद्यार्थ्यांना रवाना करण्यापूर्वी शुभेच्छा देताना सीआरपीएफचे अधिकारी.

गडचिरोली : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या मेरा युवा भारत या उपक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सहकार्याने आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमासाठी 20 युवांची निवड करण्यात आली. त्यांना उत्तरप्रदेशातील लखनौ येथे रवाना करण्यात आले.

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून युवकांना रवाना केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, या युवकांनी कार्यक्रमातून काही नवीन गोष्टी आत्मसात करून आपल्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये देशभरात मांडावीत व गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केले.

या प्रसंगी डेप्युटी कमांडंट चंचल परवाना, मंगेश दूबे, कल्याणी गायकवाड तसेच हिमांशू पेद्दीवार व गौरी सेलोटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना मिळालेली ही संधी त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देणारी ठरणार असून राष्ट्रीय पातळीवर त्यांची क्षमता आणि कौशल्य प्रदर्शित करण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.