एटापल्ली : तालुक्यातील हेडरी येथे लॉयड्स मेटल्सतर्फे दिड वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 200 व्या बाळाची प्रसुती नोंदविण्यात आली. दुर्गम भागात सुरळीत आरोग्यसेवा पुरविण्यातील हा एक मोठा टप्पा गाठल्याचा आनंद व्यक्त करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)चे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट दिली आणि बाळाला आशीर्वाद देऊन पालकांचे अभिनंदन केले.

त्यांनी याप्रसंगी लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमधील समर्पित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन केले. ते म्हणाले, “दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरवण्याच्या आमच्या भावनेचा आणि लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) हॉस्पिटलवर लोकांनी दाखवलेल्या विश्वासाचा उत्सव साजरा करण्याचा हा प्रसंग आहे. जेव्हा आम्ही हेडरी येथे हे रुग्णालय सुरू केले तेव्हा आम्हाला स्थानिक समुदायांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणायचा होता. आज आम्हाला आमच्या ध्येयात यशस्वी झाल्याचा आनंद आणि अभिमान आहे,” अशी भावना यावेळी प्रभाकरन यांनी व्यक्त केली. (अधिक बातमी खाली वाचा)
100 खाटापर्यंत करणार विस्तार
एलकेएएम रुग्णालयाने 29 जानेवारी 2024 रोजी रुग्णालयात पहिल्या बाळाचा जन्म साजरा केला होता. तेव्हापासून दीड वर्षात या रुग्णालयात 200 व्या बाळाची प्रसुती नोंदली गेली आहे. सरासरी दरमहा 11 पेक्षा अधिक बाळंतपण होत आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या 30 खाटांच्या या मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाचा विस्तार 100 खाटांच्या सुविधेत करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये अतिरिक्त आरोग्य सेवा विभागांचा समावेश असेल. लॉयड्स मेटल्स तर्फे एलकेएएम हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला, औषधे, शस्त्रक्रिया, निवास आणि जेवण प्रदान केले जाते, हे येथे उल्लेखनीय.
200 व्या बाळाच्या पालकांनी बी.प्रभाकरन यांचे मनापासून आभार मानले. हेडरीसारख्या दुर्गम ठिकाणी एलकेएएम हॉस्पिटल स्थापन करण्याचा त्यांचा दूरदर्शी उपक्रम या समुदायासाठी महत्वाचा ठरला आहे. या रुग्णालयाच्या स्थापनेपूर्वी हेडरी आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांना वैद्यकीय सुविधांच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत होता. मात्र आता एलकेएएम हॉस्पिटल मध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि सल्लागारांची एक समर्पित चमू सर्वोत्तम सेवा प्रदान करत आहे.

































