Home दैनंदिन बातम्या 20 हजार 797 उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची मैदानी चाचणी

20 हजार 797 उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची मैदानी चाचणी

आता प्रतीक्षा लेखी परीक्षेच्या यादीची

​गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026)च्या 717 पदांकरीता तसेच चालक पोलीस शिपायाच्या 27 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु आहे. याकरिता मैदानी (शारीरिक क्षमता) चाचण्या दिनांक 11 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आल्या. यात एकूण 20 हजार 797 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली. त्यातून आता लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून आठवडाभरात त्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

717 पोलीस शिपाई पदाकरिता एकुण 23 हजार 791 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यात 13 हजार 674 पुरुष, तर 6,573 महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी 12,631 पुरुष आणि 5,743 महिला उमेदवार असे एकूण 18 हजार 374 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. तसेच चालक पोलीस शिपायाच्या 27 पदाकरिता 3,296 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात 2,347 पुरुष व 452 महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी 2,099 पुरुष व 324 महिला उमेदवार असे एकूण 2,423 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.

यासोबतच उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष सुरु आहे. दि.10 मार्चपर्यंत एकुण 575 उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.

गुणवत्ता यादी आठवडाभरात लागणार

मैदानी चाचणी झालेल्या उमेदवारांची गुणांची यादी गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर लगेच दुसऱ्या दिवशी प्रकाशित केली जात होती. आतापर्यंत मैदाणी चाचणी झालेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांची यादी व लेखीपरिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी तसेच लेखी परिक्षेचा दिनांक पुढील आठवड्यात गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबविण्यात आली. यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरिक मोजणीकरीता पीएसटी (PST- Digital Physical Standard Test) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तसेच उमेदवारांची 1600 मी.धावणे (पुरुष), 800 मी.धावणे (महिला), 100 मी.धावणे (पुरुष व महिला) यांच्या चाचणीकरीता (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता प्रिझ्म टेक्नॅालॅाजीचा वापर करण्यात आला. उमेदवारांना मैदानी चाचणीदरम्यान काही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार होण्याकरीता मैदानातच रुग्णालयाची सोय करण्यात आली होती. इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण पोलीस अधीक्षक, गडचिरोली . नीलोत्पल यांच्या समक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले.

551 मनुष्यबळाचे योगदान

या मैदानी चाचणी बंदोबस्ताकरीता 69 पोलीस अधिकारी व 482 अंमलदार असे एकुण 551 मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. सर्व मैदानी चाचणी यशस्वीरित्या पार पडल्याच्या अनुषंगाने बंदोबस्तात तैनात सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफ यांच्याकरीता शनिवारी शहीद पांडू आलाम सभागृह येथे पोलीस दलाच्या वतीने स्नेहभोजनाचे (बडाखाना) आयोजन करण्यात आले होते.

सदर भरती प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.