21,495 शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीतील नुकसानभरपाई

पहिल्या टप्प्यात 10 कोटी जमा

गडचिरोली : अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी 29 कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. त्यापैकी 10 कोटी 18 लाख 78 हजार रुपये इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय हेक्टरी 10 हजार रुपये प्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

मदतीचा तपशील आणि अतिरिक्त निधीला मंजुरी

जून ते सप्टेंबर 2025 या पहिल्या टप्प्यात एकूण 21 हजार 495 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यासाठी पहिल्या टप्प्यातील 15 कोटी 63 लाख 12 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 15 हजार 361 शेतकऱ्यांच्या खात्यात 10 कोटी 18 लाख 78 हजार रुपये इतका निधी थेट जमा करण्यात आला आहे. याचबरोबर शासनाने प्रतिहेक्टर 10 हजार रुपयेप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यास 4 नोव्हेंबर 2025 रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी सध्या 13 कोटी 26 लाख 57 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. अॅाक्टोबर 2025 मधील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 11 हजार 621 शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार 7 हजार 45 हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यात येत आहे.

जमा न झालेल्या रकमेसाठी तात्काळ संपर्क साधा – जिल्हाधिकारी

“ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा झाली नसेल, त्यांनी विलंब न लावता तातडीने संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असल्यास किंवा बँक खाते नोंदीत नसून निधी परत गेला असल्यास, त्वरित आवश्यक कार्यवाही करून घ्यावी. निधी मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील,” असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.