गडचिरोली : जिल्ह्यात खतांचा तुटवडा असताना त्याचा गैरफायदा घेत अधिक दराने शेतकऱ्यांना खताची विक्री करणाऱ्या, तसेच खत असूनही न देणे, एकाच शेतकऱ्याला 20 पेक्षा अधिक बॅग युरिया देणे, परवाना अटी-शर्थींचे पालन न करणे अशा तक्रारींमध्ये तथ्या आढळल्याने 22 कृषी केंद्रांवर कारवाई करत त्यांचे रासायनिक खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय 4 केंद्रांचे रासायनिक खताचे आणि 3 केंद्रांचे किटकनाशक विक्रीचे परवाने रद्द करण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून निर्माण झालेल्या रासायनिक खताच्या तुटवड्यादरम्यान काही शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांकडून सुरू असलेल्या अनियंत्रित कारभाराच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या होत्या. त्यानुसार भरारी पथकांनी आणि जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यात आढळलेल्या तथ्यांच्या आधारे संबंधित कृषी केंद्रांना नोटीस बजावण्यात आली होती.
गुरूवारी (दि.10) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या दालनात संबंधित कृषी केंद्रांची सुनावणी झाली. यावेळी 29 कृषी केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्यावरील ठपक्याबाबत ते योग्य स्पष्टीकरण देऊ न शकल्याने परवाने निलंबन आणि रद्दची कारवाई करण्यात आली. यावेळी गुणनियंत्रण अधिकारी संजय मेश्राम व इतर अधिकारी उपस्थित होते.
15 कृषी केंद्रांकडून जास्त दराने रासायनिक खताची विक्री केली जात होती. त्यात कुरखेडा आणि आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी 5, सिरोंचा तालुक्यातील 3 आणि चामोर्शी तालुक्यातील 2 कृषी केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय कुरखेडा तालुक्यातील 3, गडचिरोली 1 आणि चामोर्शी येथील 1 याप्रमाणे 5 कृषी केंद्रांना ताकिद देण्यात आली आहे.
या कडक कारवाईमुळे आता तरी अनेक कृषी केंद्रांमधून सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.