गडचिरोली : जिल्ह्यात रविवारी 25 केंद्रांवर 3083 जणांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दिली. अतिशय कडक वातावरणात आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत डीएड पदविका आणि बीएड पदवीधारकांसाठी वेगवेगळ्या वेळेत हे पेपर झाले. सायंकाळी 5 वाजता पेपर संपल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यात कुठेही गैरप्रकार झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
या परीक्षेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी केंद्रांना भेटी दिल्या.
सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या पहिल्या पेपरसाठी 2343 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2175 जण उपस्थित तर 168 जण अनुपस्थित होते. दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या दुसऱ्या पेपरसाठी 3271 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3083 जण हजर होते. 188 जण अनुपस्थित राहिले.