सात वर्षांपूर्वीच्या कामगिरीसाठी 31 पोलिसांना शौर्यपदक जाहीर

394 अंमलदारांना दिली पदोन्नती

गडचिरोली : सन 2018 मध्ये इंद्रावती नदीलगत बोरिया-कसनासूरच्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने दोन दिवसात 40 माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार मिळून 31 जणांना राष्ट्रपतींकडून शौर्यपदक जाहीर करण्यात आले. याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण 394 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली. तसेच 10 शहीद अंमलदारांना देखील पदोन्नती मिळाली.

देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपतींच्या कार्यालयाने संपूर्ण देशभरात एकूण 121 पोलिसांना शौर्य पदक जाहीर केले. त्यापैकी गडचिरोली पोलीस दलातील 31 जणांना समावेश आहे.

सन 2025 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 7 पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्यपदक प्राप्त झाले होते. यावर्षी सन 2026 मध्ये एकुण 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहे. मागील पाच वर्षात गडचिरोली पोलीस दलास एकूण 3 शौर्य चक्र, 217 पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले आहे.

हे आहेत पदकप्राप्त अधिकारी व कर्मचारी

पोलीस शौर्यपदक प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, सहायक पो.निरीक्षक मधुकर पोचय्या नैताम, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी, एएसआय विलास मारोती पोरतेट हवालदार संतोष नैताम, विश्वनाथ सन्यासी सडमेक, ज्ञानेश्वर सदाशिव तोरे, दिलीप वासुदेव सडमेक, रामसू देऊ नरोटे, आनंदराव बाजीराव उसेंडी, राजू पंडीत चव्हाण, मोहन लच्छु उसेंडी, संदीप गणपत वसाके, नायक अरुण कैलास मेश्राम, सुधाकर वेलादी, नितेश गंगाराम वेलादी, विश्वनाथ लक्ष्मण मडावी, कैलास देवू कोवासे, हरीदास महारु कुलयेटी, किशोर चंटी तलांडे, अतुल भगवान मडावी, अनिल रघुपती आलाम, नरेंद्र दशरथ मडावी, आकाश अशोक ऊईके, घिस्सु वंजा आत्राम, राजु मासा पुसाली, महेश दत्तुजी जाकेवार, रुपेश रमेश कोडापे, मुकेश शंकर सडमेक, योगेंद्रराव सडमेक, तसेच अंमलदार कारे ईरपा आत्राम यांना पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले.

दि.22 एप्रिल 2018 रोजी बोरीया-कसनासूर ही गाजलेली चकमक झाली होती. सर्व अधिकारी व अंमलदारांनी या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती कार्यालयाने पोलीस शौर्य पदक जाहीर केले आहे.

394 अंमलदारांना पदोन्नती

यासोबतच गडचिरोली पोलीस दलातील एकूण 394 पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाली आहे. त्यापैकी 10 पोलीस अंमलदारांना वेगवर्धित पदोन्नती, तसेच 14 शहीद पोलीस अंमलदारांना देखील पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये एकूण 82 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप-निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आलील. 9 पोलीस हवालदार यांना वेगवर्धित पद्धतीने पदोन्नती मिळाली आहे. तसेच 302 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी बढती मिळाली. एका पोलीस नाईकला वेगवर्धित पदोन्नती मिळाली आहे. यासोबतच 7 शहीद पोलीस हवालदारांना सहा.पोलीस उपनिरीक्षकपदी तर 7 शहीद पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच पदोन्नतीप्राप्त पोलीस अंमलदारांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांनी कौतुक केले.