गडचिरोली : गेल्या 10 वर्षांपासून व्यवहार न झाल्याने निष्क्रिय झालेल्या बँक खात्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल 39 कोटी 44 लाख रुपये जमा आहेत. त्या रकमेचा लाभ आता पुन्हा खातेदारांना मिळू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा ठेवी “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” मध्ये हस्तांतरित केल्या जातात, परंतु त्या कायमस्वरूपी गमावल्या जात नाहीत. ठेवीदारांना योग्य अर्ज आणि केवायसी कागदपत्रांद्वारे आपले ते पैसे परत मिळवता येणार आहेत. त्यासाठी येत्या 31 डिसेंबरपूर्वी दावा नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठी रक्कम उपलब्ध
गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमधील 1 लाख 21 हजार 54 खात्यांमध्ये एकूण ₹39 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम अशी निष्क्रिय ठेवी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निधी खात्यात नोंद आहे. ही रक्कम संबंधित खातेधारकांना सहजपणे आपल्या बँकेत संपर्क करून परत मिळवता येऊ शकते. आतापर्यंत 258 नागरिकांनी दावा करून ₹2.22 कोटी रुपये परत मिळवले असून, इतर सर्व ठेवीदारांनीही तातडीने आपली प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात दि.7 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकांच्या सहभागातून एक दिवसीय जनजागृती शिबिर घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केवायसी अद्ययावत करून आणि 31 डिसेंबर 2025 पूर्वी दावा नोंदविण्याचे व आपल्या जुन्या बँक खात्यांची पडताळणी करून ती रक्कम परत मिळविण्याचे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.
































