गडचिरोली : ‘एक गाव एक वाचनालय’अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोलीस स्टेशन, उपपोस्टे, पोमकें स्तरावरुन एकुण 4200 विद्यार्थ्यांनी शनिवारी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर सोडविला. आतापर्यंत 7 टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एकूण 24,200 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत. त्याकरीता शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा यासाठी गडचिरोली पोलीस दल हे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या मदतीने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर घेत आहे. 5 जुलै रोजी या मालिकेतील सातवा सराव पेपर झाला.
गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहासह विविध पोलीस स्टेशन आणि मदत केंद्रात उभारलेल्या 71 वाचनालयांमध्ये हा सराव पेपर नि:शुल्क घेण्यात आला.
या सराव पेपरचा उपयोग येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता होणार आहे. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी या पेपरला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पेनगुंडा हद्दीतील 20, पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील 15 व पोस्टे कवंडे हद्दीतील 5 विद्यार्थ्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला.
काही ठिकाणी सार्वजनिक वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी पेपर घेण्यात आला. गडचिरोली मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरमध्ये 1800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढविले.
या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.