45 अनुकंपाधारक उमेदवारांना जिल्हा परिषदेत मिळाली नियुक्ती

अनेक दिवसांची प्रतीक्षा फळाला

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नेमणूक देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया 25 जून 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालयातील शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडली. या प्रक्रियेत प्रतीक्षासुचीत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या जेष्ठता, शैक्षणिक पात्रतेनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार पारदर्शकतेने नेमणुका देण्यात आल्या. त्यात 45 जणांची निवड करण्यात आली.

गट-क संवर्गातील 18 आणि गट-ड संवर्गातील 27 अशा एकूण 45 अनुकंपाधारक उमेदवारांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (पुरुष), विस्तार अधिकारी (कृषी), परिचर आणि चौकीदार या संवर्गातील पदांचा समावेश आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

उमेदवारांना त्यांच्या स्वीकृतीनुसार संबंधित पदांवर नियुक्ती देण्यात आली असून, नियुक्ती आदेश संबंधित विभागाकडून शैक्षणिक अर्हता व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर प्रदान करण्यात येणार असल्याचे जि.प. प्रशासनाकडून कळविण्यात आले. पेसा क्षेत्रात नेमणूक मिळालेल्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांचे पेसा प्रमाणपत्र एका महिन्याच्या आत सादर करावे, अशी अट नेमणूक आदेशासोबत नमूद करण्यात आली आहे.

सदर समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर शेलार, सहाय्यक प्रशासन अधिकारी फिरोज लांजेवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रितेश वनमाळी, वरिष्ठ सहाय्यक अविनाश कुमरे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य केले.