गडचिरोली : आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या आदिवासीबहुल क्षेत्रातील आणखी 50 युवकांची तुकडी हैदराबादसाठी रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी त्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवली. तत्पूर्वी त्यांना मार्गदर्शन करत महत्वाच्या टिप्सही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
‘तुम्हाला विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ मान्यवरांशी भेट घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला भेटलेले व्यक्तिमत्व आणि त्यांची विचारधारा यामुळे तुमच्या विचारशक्तीमध्ये तसेच व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच बदल होईल. या बदलांचे निरीक्षण करा. त्याचप्रमाणे हैदराबाद येथील विकासात्मक कामकाज पहा. त्या ठिकाणी झालेल्या विकास कार्यांची माहिती तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांपर्यंत आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचवायची आहे. विकासाच्या सकारात्मक बाबी तुमच्या गावांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इथे आलेला आहात म्हणजेच तुमच्यात खूप मोठी क्षमता आहे. या संधीचा सदुपयोग करा आणि भविष्यात तुमच्या क्षेत्रातील एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून उभे राहा,’ असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी युवकांना केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केन्द्र गडचिरोली आणि केंद्रीय रिझर्व पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 50 आदिवासी युवकांची सहावी तुकडी हैदराबाद येथे 24 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 16 व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित प्रस्थान कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा, माविमचे कार्यक्रम समन्वय अधिकारी झाडे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले. सन 2024-25 या वर्षात जिल्ह्यातील एकूण 450 आदिवासी युवकांना भारतातील विविध 9 ऐतिहासिक शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने पाठवले जाणार आहे.