कमलापूरच्या रोगनिदान शिबिरात 514 रुग्णांची तपासणी व उपचार

धन्वंतरी हॅास्पिटलचा उपक्रम

गडचिरोली : गेल्या अनेक वर्षापासून ज्येष्ठ समाजसेवी आणि राष्ट्रसंतांचे अनुयायी डॉ.शिवनाथ कुंभारे यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात रोगनिदान शिबिरांचे करण्यात येत असते. त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांद्वारे स्थापित श्री गुरुदेव आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोलीतील धन्वंतरी हॅास्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी सेंटर आणि माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोगनिदान व उपचार शिबिरांत एकूण 514 रूग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच औषधोपचार करण्यात आले.

शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी दलित मित्र नानाजी वाढई, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी अरविंद पाटील वासेकर, डॉ.अनंत कुंभारे, प्रचार प्रमुख पंडित पुडके, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी, राणी कुंभारे तसेच जिल्ह्यातील श्री गुरुदेव सेवक-प्रचारक प्रामुख्याने उपस्थित होते.

तज्ज्ञ डॅाक्टरांनी दिली सेवा

या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, एक्स-रे, अस्थिरोग, बालरोग, दमा अस्थमा, दंतरोग, स्त्री रोग आदी सर्व प्रकारच्या रूग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सर्व रूग्णांची रक्तदाब व रक्त तपासणी करण्यात आली. गडचिरोली येथील धन्वंतरी हास्पिटलचे संचालक तथा क्ष-किरण तज्ज्ञ डॉ.अनंत कुंभारे, शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.यशवंत दुर्गे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.रोहन कुमरे, ह्दयरोग तज्ज्ञ डॉ.राकेश चहांदे, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत चलाख, डॅा.निखिल चव्हाण, डॉ.मुकेश आतालगडे, डेंटल सर्जन डॉ.प्रफुल्ल वाळके, डॉ.उमेश समर्थ, स्त्री रोग तज्ज्ञ डॅा.खुशबू दुर्गे, डॉ. मयुर दुधबळे, क्षयरोग तज्ज्ञ डॉ.सचिन हेमके, डॉ.किशोर वैद्य, डॉ.रूपाली पाटील, हरिश दांडेकर, सचिन येनप्रेडीवार, अमित संगिडवार, मनिष गुड्डेवार आदींनी उत्स्फूर्तपणे सेवा दिली.

विद्यार्थ्यांना मच्छदणाऱ्या भेट

एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल परिसरातील आदिवासी बांधवांनी श्रीगुरुदेव व्यायाम व शिक्षण सेवा प्रसारक मंडळाला धन्यवाद दिले. सदर मंडळाच्या वतीने शिबिराच्या निमित्ताने आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॅाटल्स आणि मच्छरदाणी भेट स्वरूपात देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन ए.एन. कोहाडे यांनी, तर प्रास्ताविक श्री गुरुदेव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर.सी. मज्जी यांनी केले.

यावेळी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक बी.पी.चौधरी, बी.एस.सुरा , सांबया रालाबंडीवार, सोमया कोंडागुर्ला, किसन भट, बकय्या चौधरी, पुरुषोत्तम येजुलवार, शशिकला कोडाप, सावित्री चिप्पावार, श्रीधर दुग्गीरालापाटी, गणेश कोडापे, रेपलवार सावकार, जनगम काका, आश्रमशाळेचे तथा गुरुदेव विद्यालय गडचिरोलीचे शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील गोकुळनगर शाखा, रामनगर शाखा, वाकडी, डोंगरगाव, एटापल्ली शाखा येथील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना करून शिबिराची सांगता करण्यात आली.

शिबिराच्या निमित्ताने आलेल्या जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर मंडळीनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1958 साली स्थापन केलेल्या सामुदायिक प्रार्थना मंदिराचे व श्री गुरुदेव कुटीचे दर्शन घेत आपले जीवन कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.अमित साळवे यांनीही सहकार्य केले.