गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांशी समन्वय साधण्यासाठी पोलीस पाटील या पदावर असलेली व्यक्ती मुख्य भूमिका निभावत असते. गावामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, अंधश्रद्धा, गंभीर गुन्हे, काळी जादू, गावातील भांडणे इत्यादी कारणावरुन घडत असलेल्या विविध गुन्ह्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस पाटलांवर महत्वपूर्ण जबाबदारी आहे. गावामध्ये पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना तुम्ही आमचे डोळे व कान बनून काम करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हाभरातून आलेल्या पोलीस पाटलांना केले.

जिल्ह्रातील विविध गावातील पोलीस पाटलांच्या जिल्हास्तरीय समन्वय बैठकीचे आयोजन मंगळवारी (दि.8) पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नीलोत्पल बोलत होते.
सदर कार्यशाळेकरिता जिल्हाभरातील सुमारे 600 पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यशाळेदरम्यान गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांचे कर्तव्य व त्यांच्या जबाबदाऱ्या, गंभीर गुन्हे व व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, सामाजिक सलोख्याची जपणूक, अंधश्रद्धा जनजागृती इ. विषयांवर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
येणाऱ्या काळामध्ये विविध सण-उत्सवांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही म्हणून सतर्क राहिले पाहिजे. यासोबतच समन्स वॉरंट बजावण्यामध्ये, फरार आरोपींना शोधण्यास मदत केली पाहिजे. अतिदुर्गम भागात रात्री अपरात्री घडणाऱ्या गुन्ह्रांची माहिती पोलीस प्रशासनाला तात्काळ देऊन महिला पोलीस पाटील व गावांतील इतर महिलांनी आपल्या परिसरातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षकांनी केले.
उत्तर गडचिरोली जिल्हा आता माओवादापासून मुक्त झाला आहे, माओवादग्रस्त जिल्हा ही ओळख संपवून गडचिरोली जिल्हा आता विकासाकडे वाटचाल करत आहे. यासाठी आपण सर्वांनी समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर समन्वय बैठकीला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) विनोद चव्हाण उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र गाव कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगराज नाकाडे, महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अनिल खेवले, तसेच गाव कामगार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता ऊईके यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांनी प्रास्ताविक, तर प्र.पोलीस उपअधीक्षक (गृह) विनोद चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.