गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. तीनही न.प.मिळून एकूण 68 नगरसेवकांच्या जागांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. यात जिल्ह्याभरातून एकूण 92 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी या नगरपरिषद क्षेत्रात 105 मतदान केंद्रे राहतील. या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

नगर परिषदनिहाय तपशील
गडचिरोली नगर परिषदमध्ये सर्वाधिक 43,513 मतदार आहेत. त्यांच्यासाठी 46 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत एकूण 27 सदस्यांची निवड होणार आहे.
देसाईगंज नगर परिषदेत 26,352 मतदार असून, 32 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी एकूण 21 सदस्यांची निवड केली जाईल.
आरमोरी नगर परिषदेमध्ये 22,999 मतदार आहेत, जे 27 मतदान केंद्रांवर मतदान करतील. आरमोरीसाठी एकूण 20 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.
पुरूषांपेक्षा महिला सदस्य जास्त
या निवडणुकीत महिला प्रतिनिधीत्वावर विशेष भर देण्यात आला आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये निवडून द्यावयाच्या एकूण 68 सदस्यांपैकी तब्बल 35 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
68 जागांपैकी 31 जागा सर्वसाधारण, 18 जागा नामाप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग)साठी, 11 जागा अनुसूचित जाती आणि 8 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत.
महिला आरक्षणाचा तपशील
गडचिरोली नगर परिषदेतील 27 पैकी 14 जागा, देसाईगंज नगर परिषदेतील 21 पैकी 11 जागा आणि आरमोरी नगर परिषदेतील 20 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये विविध प्रवर्गातील स्त्रियांना संधी मिळाली आहे. गडचिरोलीत सर्वसाधारण गटातील 6 जागा, देसाईगंजमध्ये सर्वसाधारण गटातील 6 जागा आणि आरमोरीमध्ये सर्वसाधारण गटातील 3 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत.
































