हेल्मेट न वापरणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वाराचा बळी, दोघे गंभीर

अल्लीटोलाजवळ समोरासमोर धडक

कोरची : अलिकडे नवीन दुचाकी खरेदी करताना हेल्मेट घेणे सक्तीचे केले असतानाही त्याचा वापर केला जात नाही. हा निष्काळजीपणा जीवावर बेतत आहे. कोरची तालुक्यातल्या बेतकाठी-बोटेकसा मार्गावर अशाच दोन दुकाचींची समोरासमोर धडक होऊन एकाला जीव गमवावा लागला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या दुचाकीस्वारांपैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते, अशी माहिती आहे.

रामप्रसाद सदाराम ताराम (38 वर्ष, रा.ढोलडोंगरी) असे मृत इसमाचे नाव असून संदीप कुंभरे (29 वर्ष) व सहदेव काटेंगे (23 वर्ष) अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

अल्लीटोला गावापासून दोन किलोमीटरवर हा अपघात घडला. देवरी तालुक्यातील माहका या गावी आपल्या सासऱ्यांना दुचाकींने सोडून रामप्रसाद ताराम हे ढोलडोंगरी या आपल्या गावाकडे परत येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने अल्लीटोला येथून जखमी असलेले दोघे दुचाकीने बोटेकसा येथे आठवडी बाजारात जात होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.