गडचिरोली : दुचाकीने ट्रिपल सीट जात असताना आष्टीजवळच्या वैनगंगा नदीवरील पुलावर खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात बापलेक नदीत कोसळले होते. यातील वडीलांना लगेच पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात यश आले असले तरी किशोर वासेकर हा युवक पाण्याच्या प्रवाहात गायब झाला होता. शोधमोहिमेत अखेर २५ तासानंतर त्याचा मृतदेहच हाती लागला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत, गोंडपिपरी पोलिस स्टेशनअंतर्गत जवळच्या पानोरा गावाजवळील नदीपात्रात त्याचा मृतदेह सोमवारी दुपारी सापडला. तो सुरजागड लोहखाणीतील खनिज वाहून नेणाऱ्या ट्रकांची वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या सुरक्षा कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता.
कुरघाडा (माल) येथील रहिवासी असलेले हे बापलेक विठ्ठलवाडा येथून आपले काम आटोपून दुचाकीने गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला. यावेळी किशोर आणि त्याचे वडील गणपती वासेकर हे दोघेही दुचाकीसह पाण्यात कोसळले, तर शुभम बोलगोडवार हा युवक पुलावरच पडल्याने बचावला.
या अपघातानंतर एका चारचाकी वाहनधारकाने लगेच गाडी थांबवून गाडीतील दोरी नदीत टाकून दोघाही बापलेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण गणपती वासेकर यांनाच जीवदान मिळाले.
कुटुंबियांवर कोसळले आभाळ
मृत किशोरच्या अशा अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे.
तो विवाहित असून त्याला पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
































