मारून टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचे नातेवाईकाकडूनच लैंगिक शोषण

आरोपीला 25 वर्षांच्या शिक्षेसह लाखाचा दंड

गडचिरोली : जादुटोणा करून तुला आणि कुटुंबातील लोकांना मारतो अशी धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीचे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम.मुधोळकर यांनी एकूण 25 वर्षांची शिक्षा ठोठावली. यात बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी 20 वर्ष तर कलम 506 मध्ये दोषी ठरवून 5 वर्षाच्या शिक्षेचा समावेश आहे. याशिवाय 1 लाख रुपये दंडही ठोठावला. विशेष म्हणजे आरोपी हा त्या मुलीचा नातेवाईक आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीच्या गोकुलनगरातील पीडित 15 वर्षीय मुलगी नातेवाईकाच्या घरी जेवायला गेली असताना आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले (34 वर्ष) रा.विकेकानंद नगर, गडचिरोली याने तिला मच्छी आणायला जाण्याच्या निमित्ताने सोबत नेले. तेथून परत येताना झाडाझुडपात जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी आरोपीने तिला ही गोष्ट कोणाला सांगितले तर तुझ्या आईला, भावाला आणि तुलाही जादुटोणा करून मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा आरोपीने घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान मुलीचे आई कोरोनाच्या लॅाकडाऊननंतर दीर्घ कालावधीने घरी परत आल्यानंतर त्यांना पीडित मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत अखेर गडचिरोली पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानुसार आरोपी टिंगुसले याच्याविरूद्ध बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास सहा.पोलिस निरीक्षक पुनम गोरे यांनी केला.