हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई; 100 वर सिलिंडर जप्त

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर

गडचिरोली : घरगुती वापरासाठी सबसिडीवर दिल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या नेतृत्वात दि.13 ते 15 डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत 100 पेक्षा जास्त सिलिंडर जप्त करण्यात आले.

या मोहिमेत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, खरेदी अधिकारी या नोडल अधिकाऱ्यांच्या अंतर्गत तालुक्यातील 12 निरीक्षण अधिकारी, 17 पुरवठा निरीक्षक, 9 गोदाम व्यवस्थापक, 29 लिपिक आणि 8 शिपाई अशा एकूण 78 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान विविध हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करताना आढळलेल्या व्यावसायिकांकडून एकूण 100 पेक्षा अधिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. सबसिडीचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक हेतूने त्या सिलिंडरचा वापर केला जात होता. ज्यामुळे सरकारच्या सबसिडी योजनेचा दुरुपयोग होत होता आणि सामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा प्रभावित होत होता.

निळ्या रंगाचे कमर्शियल एलपीजी सिलिंडरच वापरा

जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले की, ‘घरगुती गॅस सिलिंडर फक्त घरगुती वापरासाठीच आहेत. व्यावसायिकांनी निळ्या रंगाचे कमर्शियल सिलिंडर वापरावेत. घरगुती लाल रंगाच्या सिलिंडरचा व्यावसायिक वापर हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात सतत छापे आणि तपासणी मोहीम सुरू राहील. दोषी आढळलेल्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असेही पवार यांनी सांगितले.

जप्त करण्यात आलेली सिलिंडर संबंधित गॅस वितरकांना सुपूर्द करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.