निवडणुकीसाठी नेमून दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेमून दिलेली कामे नियमांचे पालन करून जबाबदारीपूर्वक आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी गुरूवारी (दि.29) दिले. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक विविध कामे सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी आणि सहाय्यक यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने संजय मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला.

या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर.टेंभुर्णे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, तहसीलदार प्रीती डुडूळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीचे कामकाज टप्पेनिहाय पार पाडण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेची माहिती देण्यात आली. कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विषय समितीने कोणकोणती कामे करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

27 शाखांसाठी समन्वयकांची नियुक्ती

निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी मीना यांनी विविध शाखानिहाय समन्वयक आणि सहाय्यक अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. यात पत्रव्यवहार, नामनिर्देशन, आय.टी.सेल, वाहतूक व्यवस्था, मतपत्रिका, निवडणूक साहित्य, आदर्श आचारसंहिता, मतदार यादी, प्रसिद्धी, इव्हीएम सुरक्षा कक्ष, निवडणूक खर्च, मतदार मदत केंद्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदि 27 शाखांचा समावेश आहे.