ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

29 सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

गडचिरोली : शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेत शासकीय वसतिगृहांबरोबरच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पं.दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज

शासनाच्या http://hmas.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 19 ते 29 सप्टेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृह प्रमुखांकडे सादर करणे बंधनकारक आहे.

प्रवेश निकष व प्राधान्य

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश गुणवत्तेनुसार व वसतिगृह क्षमतेनुसार दिला जाणार आहे. पात्रता असूनही वसतिगृहात जागा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयं व आधार या योजनांमधून प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

अधिक माहितीसाठी इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विशेष जाती भटक्या जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, येथील गृहपाल किंवा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.