गडचिरोली : अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण व क्रिमिलेयर लागू करण्यासंदर्भात दिलेला निर्णय संविधानाच्या आरक्षणातील मुलतत्त्वांच्या विरोधात जाऊन पारित केल्याचे सांगत बुधवारी याविरोधात गडचिरोलीसह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बंद पाळण्यात आला. शाळा-महाविद्यालये आणि बाजारपेठही बऱ्याच अंशी बंद होती. अहेरीत अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.
क्रिमिलेयर लागू केल्यास फार मोठे नुकसान व फटका बसणार असून हा निर्णय संविधानविरोधी असल्याने संसद व भारत सरकारने यावर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या निर्णयाचे पुनरावलोकन न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.
अहेरीत निवेदन देताना ॲड.पंकज दहागावकर, सुरेंद्र अलोणे, ॲड.उदय प्रकाश गलबले , प्रा.रमेश हलामी, प्रा.अतुल खोब्रागडे, छत्रपती गोवर्धन, सोहील वाळके, अक्षत ओंडरे, प्रिया दुर्गे, पल्लवी दहागावकर, आकांक्षा दहागावकर, स्वप्नील भारशंकर, निखिल रत्नम, शशिकांत नैताम यांच्यासह अनेक युवक-युवती उपस्थित होते.