वनविभागात रोहयोच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करा

मानवाधिकारचे ठिय्या आंदोलन

गडचिरोली : आलापल्ली वनविभागाच्या आलापल्ली आणि पेरमिली वनपरिक्षेत्रातील रोहयोच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॅा.प्रणय खुणे आणि शंकर ढोलगे यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

यासंदर्भात माहिती देताना डॅा.खुणे यांनी सांगितले की, या कामात बोगस मजुर असून त्यांच्या स्वाक्षऱ्याही खोट्या आहेत. आरटीजीएस आणि व्हाऊचर यातही तफावत आहे. या पद्धतीने जवळपास दिड कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भातील कागदपत्रेही वनविभागाला सादर केल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या कामात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपाल, वनरक्षक अशा सर्वांवर कारवाई करावी. आम्ही पुरावे सादर केले असतानाही वनविभाग केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगत आहे, पण त्यांनी तात्काळ कायदेशिर कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे खुणे म्हणाले. तीन महिन्यांपासून आम्ही यासंदर्भात तक्रार करून पाठपुरावा करत आहे, मात्र आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.