गडचिरोली : देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना, 11 प्रधान कामगार संघटना आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार कामगार-कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आज दि.12 रोजी संप पुकारला आहे. राज्य सरकारी- जिल्हा परिषद (निमशासकीय), शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने या आंदोलनास पाठिंबा दिला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांचे धरणे आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय कामगार, शेतकऱ्यांना घेऊन सिटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता निदर्शने केली जाणार आहेत. काँग्रेस पक्षानेही या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
चार कामगार संहिता रद्द करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, आठवा वेतन आयोग तात्काळ लागू करा, रिक्त पदे भरा, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा योजना लागू करा, अशा व इतर महत्वाच्या मागण्यांकडे संपाद्वारे लक्ष वेधले जाणार आहे.
राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्यांचा विचार केल्यास सुधारित पेन्शन योजना 1 मार्च 2024 पासून लागू करण्याची घोषणा झाली आहे, परंतु त्या संदर्भातील नियम व कार्यपध्दती अद्याप प्रसृत करण्यात आलेली नाही. सर्व संवर्गाच्या वेतनात सुधारणा करण्यात याव्यात. जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पुनर्जिवीत करावी, खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरणास मज्जाव करुन कंत्राटी कर्मचारी 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा करीत आहेत त्यांच्या सेवा नियमित कराव्या अशा अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला जाणार आहे. संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, तसेच दामोदर पटले, साई कोंडावार, दुधराम रोहणकर, संजय खोकले, सुनिल चडगुलवार, भास्कर मेश्राम, लतिफ पठाण, किशोर सोनटक्के आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सीटूच्या नेतृत्वात निदर्शने
केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता आंदोलन करतील. या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी कामगार आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी केले आहे.
कामगारांवर अन्याय करणाऱ्या चार श्रमसंहिता रद्द करा, असंघटित कामगारांना 26 हजार रुपये वेतन द्या, 60 वर्षावरील सर्व कामगार, शेतकरी, शेतमजुरांना 5000 रुपये मासिक पेन्शन द्या इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत. या आंदोलनात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन परिचर, कामगार व शेतकरी, शेतमजूर यांच्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व सिटू संघटनेचे रमेशचंद्र दहिवडे, अमोल मारकवार, डॉ.धर्मराज सोरदे, राज बन्सोड करणार आहेत.
जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या भारत बंदला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.
नव्या कामगार कायद्यांमुळे रोजगाराच्या संधी कमी होत असून कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारची आर्थिक धोरणे ही कामगार व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी या भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
































