Home दैनंदिन बातम्या आजपासून गडचिरोलीत ‘कोया कृषी कुंभ 2026’ महोत्सव

आजपासून गडचिरोलीत ‘कोया कृषी कुंभ 2026’ महोत्सव

5 दिवस शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतातील पीक विविधीकरण, शेतीपुरक व्यवसाय, उच्च मूल्य पिके, तसेच सक्षम तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठ मिळण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारे पाच दिवसीय कृषी प्रदर्शन ‘कोया कृषी कुंभ 2026’ आजपासून सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी (दि.5) दुपारी 12 वाजता कृषी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे.

मूल मार्गावरील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणारे हे प्रदर्शन भव्य स्वरूपात राहणार असून त्यात शेतकरी, शास्रज्ञ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बाजारातील घटक एकत्र येणार आहेत. प्रामुख्याने पावसावर अवलंबून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीस अनुरूप, उपजीविकेपुरत्या भातशेतीतून बाजाराशी जोडलेल्या, शाश्वत कृषी उपजीविकेकडे शेतकऱ्यांना वळवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर यांनी सांगितले.

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने 5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या या कृषी प्रदर्शनात खरेदीदार-विक्रेता मेळावाही होणार आहे. कृषी क्षेत्राशी पुरक सर्व विभाग या प्रदर्शनात सहभागी होऊन त्यांच्या योजना आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण करतील. तसेच नामांकित बियाणे कंपन्या, शेती यांत्रिकीकरण क्षेत्रातील संस्था आणि कृषी तंत्रज्ञान पुरवठादार सहभागी होऊन सुधारित बियाणे वाण, हार्वेस्टर व इतर आधुनिक शेती उपकरणे व तंत्रज्ञानाचे सादरीकरण करतील.

असे असतील पाच दिवसीय कार्यक्रम

दि.5 ला गौण वनउपज व्यवस्थापन या विषयावर देवाजी तोफा, मधमाशी पालन व फायदे या विषयावर आनंद जक्कुलवार, आणि उत्पादनापासून बाजारापर्यंत या विषयावर सतीश गिरसावळे हे मार्गदर्शन करतील.

दि.6 ला होणाऱ्या व्याखानमाला व तांत्रिक सत्रांत 23 तज्ज्ञ व शास्रज्ञ सहभागी होणार आहेत. यातील एका सभागृहात किफायतशिर सेंद्रिय शेती व सेंद्रिय प्रमाणीकरण या विषयावर शिवराम घोडके आणि दुसऱ्या सभागृहात जैविक शेती व प्रमाणीकरण या विषयावर इरफान कादीर शेख मार्गदर्शन करतील.

दि.7 ला एका सभागृहात बांबू क्षेत्रातील संधी या विषयावर डॅा.पाशा पटेल, स्थानिक बियाण्यांचे महत्व या विषयावर राहिबाई पोपेरे, बांधावरील प्रयोगशाळा निर्मिती या विषयावर डॅा.संतोष चौहान हे मार्गदर्शन करतील. तर दुसऱ्या सभागृहात कृषी पर्यटनावर पांडूरंग तावरे मार्गदर्शन करणार आहेत.

दि.8 ला विश्वविक्रमी नाचणी शिरा आणि नाचणी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते 1111 किलो नाचणी (रागी) हलवा तयार करून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमातून भरडधान्याचे पोषणमूल्य, हवामान बदलास अनुरूपता आणि खाद्यपदार्थांमधील बहुपयोगिता अधोरेखित करत जागृती निर्माण करण्यात येणार आहे.

तसेच व्याख्याने व तांत्रिक सत्रांच्या मालिकेत एका सभागृहात कृषी यांत्रिकीकरण या विषयावर डॅा.संदीप कऱ्हाळे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची यशस्वी वाटचाल या विषयावर बालाजी धोबे, शेतकरी उत्पादक कंपनी कायदे यावर सुभाष रहांगडाले मार्गदर्शन करतील. तर दुसऱ्या सभागृहात भात खाचरात शिंगाडा लागवड या विषयावर संदीप प्रधान आणि वनउपज प्रक्रिया विषयावर योगिता सानप मार्गदर्शन करणार आहेत. याच दिवशी खरेदीदार-विक्रेता मेळावाही होणार आहे.

दि.9 ला व्याख्यानमाला, तांत्रिक सत्रानंतर प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. या दिवशी एका सभागृहात आदर्श गाव संकल्पना विषयावर पोपटराव पवार, जल साक्षरता विषयावर मनोहर हेपट, पशुसंवर्धन यावर वैभव सोमनकर, तर दुसऱ्या सभागृहात पशुसंवर्धन विषयावर मुकुंद कदम, कृषी आधारित उद्योग निर्मिती व शासकीय योजना यावर समीर मस्के आणि पीएमएफएमई योजनांविषयी आनंद कांबळे माहिती देतील.