चक्क 90 टक्के अनुदानावर घ्या विविध कृषी योजनांचा लाभ

शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्व भेट

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाने विविध नाविन्यपूर्ण व अनुदानावर आधारित योजना राबविण्याची तयारी केली आहे. या योजना शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्व “कृषि समृद्धीची भेट” ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले.

प्रमुख उपक्रम

सौर कुंपण, सामुदायिक शेततळे, शिंगाडा लागवड, चारोळी-मोहफूल प्रक्रिया प्रकल्प, मोती उत्पादन व आळंबी शेती यासारखे उपक्रम 90-95 टक्के अनुदानावर राबविले जाणार आहेत.

कृषि समृद्धी योजना 2025-26

या योजनेअंतर्गत शाश्वत शेती, उत्पादनवाढ आणि भांडवली गुंतवणुकीस चालना देण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, डिजीटल शेती, प्रक्रिया व निर्यात या क्षेत्रांना प्राधान्य दिले असून, महिला, अल्पभूधारक, अनुसूचित जाती-जमाती व दिव्यांग शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
लाभार्थी निवड “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS)” या तत्त्वावर होईल. सर्व अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येतील.

फळोत्पादन विकास अभियान

एकात्मिक फळोत्पादन विकास अभियानांतर्गत फळबाग पुनरुज्जीवन, मधुमक्षिका पालन, शेडनेट/ हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, पॅक हाऊस, शीतगृह, ट्रॅक्टर व पॉवर टिलर खरेदी अशा घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.