अहेरी : दसऱ्याच्या निमित्ताने अहेरी शहरात मंगळवारी रात्री प्रथमच शानदार कव्वाली मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनमंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
अहेरी शहरात दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. केवळ अहेरी उपविभागातील नागरिकच नाही तर जिल्ह्यातील विविध भागातून दसरा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. या उत्सवाला यंदा कव्वालीच्या रूपाने अधिक मनोरंजक करण्यात आले. देश-विदेशात प्रसिद्ध असलेले जुनेद सुलतानी, रा.दिल्ली आणि झारा डिस्को, दिल्ली यांनी कव्वाली मुकाबल्यातून उपस्थित जनतेला खिळवून ठेवले.
20 ऑक्टोबरला मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानंतर दुर्गा उत्सव व दसऱ्याच्या निमित्ताने अहेरीत येणाऱ्या नागरिकांची उपस्थिती बघून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी कव्वाली मुकबल्याचे आयोजन केले होते.
यावेळी धर्मरावबाबा आत्राम, युवानेते ऋतुराज हलगेकर, भाग्यश्री आत्राम यांनी कव्वालीचा आनंद घेतला. गांधी चौकात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. एकंदरीत दसरा उत्सवात उपस्थित नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.