अपघातग्रस्त मुलांच्या कुटुंबियांना मिळणार प्रतिकुटुंब चार लाख

मंत्री दादा भुसे व अधिकारी घटनास्थळी

रस्त्यावर बसून आंदोलकांशी चर्चा करताना मंत्री दादा भुसे

गडचिरोली : काटलीतील दुदैवी अपघातानंतर त्या मृत चारही मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्याबाबतचा निरोप घेऊन काटली येथील आंदोलनस्थळ गाठले. तत्पूर्वी त्यांनी जखमी मुलांना नागपूरला हलविण्यापूर्वी त्यांची एमआयडीसी हेलिपॅड येथे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

काटली येथील चक्काजाम आंदोलनाच्या ठिकाणी दादा भुसे पोहोचले त्यावेळी अनेक ग्रामस्थ भावनिक अवस्थेत होते. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांशी मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी थेट संवाद साधला. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन तुमच्यासोबत असल्याचे सांगत त्यांनी गावकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रतिकुटुंब चार लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर केली असून, जखमी विद्यार्थ्यांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण ही मदत अपुरी असून विमान किंवा इतर अपघातातील मृतांप्रमाणे मदत हवी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यावर वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्‍यांशी बैठक घेऊन चर्चा करू आणि त्यावर निर्णय घेऊ, अशी ग्वाही यावेळी ना.भुसे यांनी दिली. तसेच जखमी मुलांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल असेही सांगितले. गावकऱ्यांनी मुलांना खेळण्यासाठी, व्यायामासाठी क्रिडांगण तसेच मार्गावर गावाजवळ गतीरोधक देण्याची मागणी केली. गावात जागा उपलब्ध झाल्यास क्रिडांगण निर्माण केले जाईल असे दादा भुसे यांनी सांगितले. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यांनी समजूत काढल्यानंतर गावकरी बऱ्याच अशी शांत झाले. त्यानंतर चक्काजाम आंदोलन थांबवत असल्याचे सरपंचांनी जाहीर केले.

काटलीवरून ना.दादा भुसे जिल्हा परिषद सभागृहामधील नियोजित बैठकीसाठी आले, पण अपघाताच्या घटनेमुळे त्यांनी ती बैठक रद्द केली. त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत संबंधित कुटुंबियांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार मुलांना मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृहात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.