गडचिरोली : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 1 डिसेंबरला जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गडचिरोलीत जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली.
डॉ.नागदेवते यांनी एड्स विरोधी शपथेचे वाचन केले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी “मार्ग हक्काचा सन्मानाचा” या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्सबाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा तसेच शासनाच्या योजनांयाविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणेने कार्य करावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी एड्सविरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय ते गांधी चौक, कारगिल चौक मार्गे परत जिल्हा महिला व बाल रुग्णालयात समाप्त करण्यात आली. रॅलीमध्ये महाविद्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीनी एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रकांचे वाटप केले. तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विद्यार्थ्यांनी बसस्थानकात पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत आखाडे, डॉ.दुर्वे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.साखरे, महेश भांडेकर, डॉ.अभिषेक गव्हारे, तसेच अधिसेविका, वैद्यकीय कर्मचारी आणि विहान प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेशक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधिसेविका रामटेके यांनी मानले.