अहेरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या नवनिर्मित जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाले. गुरूवारी विधिवत पुजाअर्चा केल्यानंतर शुक्रवारपासून या कार्यालयात जनसंपर्क सुरू करण्यात आला.
अजय कंकडालवार आणि माजी पंचायत समिती उपसभापती सोनाली कंकडालवार यांच्या हस्ते पुजाअर्चा करून वास्तूपूजन करण्यात आले. सध्या राहात असलेल्या प्रभाग क्रमांक १० मधील त्यांच्या निवासस्थानासमोरच या नवीन कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. अलिकडे त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढल्यामुळे यापूर्वीची जागा अपुरी पडत होती. त्यामुळे नवीन आणि सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचे बांधकाम त्यांनी केले.
सध्या अजयभाऊ मित्र परिवाराकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. परिसरातील अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. येणाऱ्या लकार्यकर्त्यांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच या सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचे बांधकाम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.