Home दैनंदिन बातम्या 697 कोटींचा विकास निधी खर्च; मार्चअखेर महसूल वसुलीही पूर्ण

697 कोटींचा विकास निधी खर्च; मार्चअखेर महसूल वसुलीही पूर्ण

गडचिरोली जिल्ह्याची कामगिरी

गडचिरोली : नियोजनबद्ध कामकाज, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे सन 2025-26 या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्याने विकास निधी खर्च करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली. मार्चअखेर 100 टक्के निधी खर्चाचे उद्दिष्ट साध्य करण्यात यंत्रणांना यश आले. तसेच महसूल वसुलीतही उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली करत यशस्वी कामगिरी नोंदविण्यात आली.

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात विविध योजनांअंतर्गत एकूण 697.06 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 456 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 36 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेअंतर्गत 202.38 कोटी रुपये, तसेच आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी 2.68 कोटी रुपये असा निधी समाविष्ट होता. या संपूर्ण निधीचा 100 टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

विकास निधीचा वेळेत व प्रभावी वापर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सातत्याने आढावा बैठका घेत विविध यंत्रणांना निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विभागनिहाय प्रगतीचा नियमित आढावा घेत अडचणी तत्काळ दूर करण्यात आल्यामुळे निधी खर्चाचा वेग कायम राखण्यास मदत झाली.

यासोबतच महसूल वसुलीच्या बाबतीत जिल्ह्यासाठी निर्धारित 116 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 118 कोटी रुपयांची प्रत्यक्ष वसुली करण्यात आली. उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी नोंदविण्यात आली आहे.