गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाद्वारे आयोजित तीन दिवसीय अमृत कला व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी उत्साहात करण्यात आले. कला आणि क्रीडा हे व्यक्तिमत्त्व विकासाचे दोन सशक्त स्तंभ आहेत. सुदृढ शरीर आणि सर्जनशील मन हे यशस्वी कर्मचाऱ्याचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभाग प्रमुख संयुक्ता थोरात यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना याप्रसंगी केले.
कला माणसाच्या अंतर्मनातील सर्जनशीलतेला वाव देत तणावमुक्तीचा मार्ग दाखवते, तर खेळांमुळे शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वासाची जोपासना करून शरीर सुदृढ राहाते. या दोन्हींच्या संगमातून व्यक्ती मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनते आणि जीवन अधिक संतुलित व आनंदी होते, असे थोरात यांनी सांगितले.
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, तर प्रमुख उपस्थिती म्हणून क्रीडा संचालक (प्र.) डॉ.अनिता लोखंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके उपस्थित होते. अधिसभा सदस्य सतीश पडोळे, विजयकुमार घरत, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संदेश सोनुले, महाविद्यालयीन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खोके, महासचिव अरुण जुनघरे आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण म्हणाले, प्रत्येकामध्ये एक ‘राजहंस’ दडलेला असतो. त्याला योग्य व्यासपीठ मिळाले की तो आपले सामर्थ्य सिद्ध करतो. अमृत कला व क्रीडा महोत्सव हा त्याच सुप्त गुणांना संधी देणारा उपक्रम असून सर्वांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी सागर मधुमटके यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत गीतांच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण आणि सागर मधुमटके यांनी गायलेल्या गीतांवर उपस्थितांनी मनमुराद टाळ्यांचा कडकडाट केला. डॉ.संयुक्ता थोरात यांनी आपल्या अभिनयकौशल्याची झलक सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयांतील सुमारे 450 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा क्रीडा व कला महोत्सव 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान विद्यापीठ परिसरात रंगणार आहे. कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि खेळांविषयी उत्साह वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून उत्साह, ऊर्जा आणि सहभागाचे हे पर्व अधिकच बहरलेले दिसून आले. कार्यक्रमाचे संचालन योगेश सोपानकर यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ.संदेश सोनुले यांनी केले.
































