बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात आज गुरवळाच्या जंगलात होणार प्राणीगणना

नागरिकांनाही अनुभवता येईल थरार

गडचिरोली : गडचिरोली नजिकच्या गुरवळा नेचर सफारीमध्ये बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 23 मे रोजी संपूर्ण रात्रभर जंगलातील मचाणावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून गडचिरोली वनविभागातील वन्यप्राण्यांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे नवखे निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच विद्यार्थी यांना देखील संपुर्ण रात्र जंगलात थरारक अनुभव लुटता यावा आणि दर्शन देणाऱ्या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणून गडचिरोली वनविभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले आहे.

बुध्द पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाशात निसर्गानुभव घेत असताना तसेच रात्री प्राणी प्रगणना करीत असताना प्रामुख्याने वाघ, बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा यांसह चितळ, भेडकी, चौशिंगा, सायाळ, नीलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षीही आढळतात. जंगल सफारीच्या दरम्यान वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभवही मिळतो. यासाठी प्रतीव्यक्ती एक हजार रुपये इतके शुल्क आकारण्यांत येणार आहे. सदर शुल्कातून निसर्ग अनुभवणाऱ्या व्यक्तींसाठी भोजन व इतर व्यवस्था करण्यात येणार आहे.

या प्राणीगणनेत सहभागी होण्यासाठी 8275840208, 7744960255 या क्रमांकावर संपर्क साधून नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन मुख़्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक धिरज ठेंबरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, गुरवळाचे क्षेत्र सहाय्यक विजय जनबंधू यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, नेचर सफारी गाईड करीत आहेत.