लॉयड्स राज विद्या निकेतनच्या वार्षिकोत्सवात संस्कृतीची झलक

‘उदित उत्सव II’ची सांगता

उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत बी.प्रभाकरन

गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या हेडरी येथील लॅायड्स राज विद्या निकेतनचा (LRVN) वार्षिकोत्सव ‘उदित उत्सव II’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांसह जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाची झलक दिसून आली. शाळेचा विकास, उत्कृष्टता आणि सामाजिक प्रभावाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि लॅायड्स राज विद्या निकेतनचे अध्यक्ष बी.प्रभाकरन, लॅायड्स इन्फिनिटी फाउंडेशनच्या संचालक कीर्ती रेड्डी आणि इतर अतिथी उपस्थित होते. या मान्यवरांचे सुनीता मेहता (प्रकल्प संचालक- सीएसआर), नितीन चौधरी (सीईओ- राज विद्या निकेतन), आणि अर्चना जोशी (मुख्याध्यापिका) यांनी औपचारिक स्वागत केले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. बुद्धी आणि समृद्धीसाठी दैवी आशीर्वाद मागणारी सुंदर गणेश वंदना सादर करण्यात आली. शाळेच्या गायन चमूने नंतर राग यमनमध्ये एक भावपूर्ण शास्त्रीय गायन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी आपल्या प्रेरणादायी भाषणात, बी.प्रभाकरन यांनी या भागाच्या विलक्षण परिवर्तनावर आपले मत व्यक्त केले. एकेकाळी अशांतता आणि नुकसानीने चिन्हांकित असलेला हा भाग, पाच वर्षांच्या आत आशा आणि संधीचे केंद्र म्हणून कसा उदयास आला, हे त्यांनी नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त, आत्मविश्वास आणि परिपूर्णतेची प्रशंसा केली. संस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कीर्ती रेड्डी यांचे नेतृत्व आणि सुनीता मेहता व अर्चना जोशी यांच्या समर्पित मार्गदर्शन व मेंटरशिपची त्यांनी प्रशंसा केली.

विद्यार्थ्यांना प्रेम आणि आपुलकीने संबोधित करताना, प्रभाकरन यांनी त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि निर्भयपणे महत्त्वाकांक्षा बाळगण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी एक हजार विद्यार्थ्यांसोबतचे आपले नाते एका मार्गदर्शक पितृतुल्य व्यक्तीसारखे असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत राहण्याचे वचन देत, आपल्या अतुट समर्थनाची खात्री दिली.

आपल्या भाषणात, मुख्याध्यापिका अर्चना जोशी यांनी वर्षभरातील शाळेच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. ‘मिमांसा’ या संस्थेकडून लॅायड्स राज विद्या निकेतनला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा म्हणून बहुमान मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे मान्यवर आणि उपस्थितांकडून शाळेच्या सर्वांगीण शिक्षणाप्रती असलेल्या कटिबद्धतेला मोठी दाद मिळाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्कूल रिपोर्ट’मध्ये वर्षादरम्यान राबवलेल्या शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रमाच्या उपक्रमांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक वर्ग कक्षातील नवकल्पना, क्षमता-निर्माण कार्यशाळा, विशेष कार्यक्रम आणि शैक्षणिक सहलींचे तपशील सादर केले.

संध्याकाळचे सांस्कृतिक आकर्षण ‘भारत एक खोज’ हे होते. भारताच्या महान संत पतंजली यांच्या ज्ञानापासून ते अंतराळ संशोधनासह देशाच्या समकालीन उपलब्धींपर्यंतचा प्रवास यात मांडण्यात आला. संकल्पनेची खोली, नृत्यदिग्दर्शन, कथन प्रवाह आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या शिस्त व अचूकतेसाठी या सादरीकरणांचे खूप कौतुक झाले.

पुरस्कार वितरण समारंभात विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेला सन्मानित करण्यात आले. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना कीर्ती रेड्डी आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या चिकाटी आणि यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. सर्वांगीण उत्कृष्टता आणि नेतृत्वाचा गौरव करणारे प्रतिष्ठित ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ (कनिष्ठ आणि वरिष्ठ) पुरस्कार बी.प्रभाकरन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

संस्कृती, यश आणि राष्ट्रीय अभिमानाचा उत्सव असलेला ‘उदित उत्सव II’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा मान्यवरांसह पालक आणि पाहुण्यांच्या कौतुकास पात्र ठरला. त्यामुळे आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदार नागरिक घडवण्याच्या लॅायड्स विद्या निकेतनच्या ध्येयाला अधिक बळ मिळाले.