भामरागड : भामरागड पंचायत समितीची आमसभा बुधवारी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या कामांचा आढावा घेत पुढील नियोजनावर चर्चा झाली. यावेळी अनेक नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. त्यावर धर्मरावबाबांनी येत्या दोन वर्षात शिल्लक असलेले सर्व रस्ते तयार होऊन कोणतीही तक्रार राहणार नाही, असे आश्वस्त केले.
या आमसभेला तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांच्यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, तसेच पंचायत समिती स्तरावरील इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि रस्त्यांच्या समस्या मांडल्या. शासनाच्या योजनेनुसार पाणी पुरवठ्याची व्यवस्था प्रत्येक गावात केली जात असल्याचे आणि ही कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.