गडचिरोली : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी-चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सी.एम. इंटरनॅशनल स्कूल, बानेर (पिंपरी-चिंचवड) येथे आयोजित पहिल्या पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत गडचिरोलीच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेची विद्यार्थिनी अनु रघुपती नैताम हिने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे.
इंडियन राउंड या प्रकारात अनु हिने वैयक्तिक रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे तिची पटियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पद्मश्री पुरस्कारार्थी धनुर्धर मुरलीधर पेटकर यांच्या हस्ते अनुला पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम., सहायक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ.प्रभू सादमवार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गडचिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ.श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, पायलट प्रोजेक्ट धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोलंके, कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अनुचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
































