गडचिरोली : कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरीत्या आढळून येणाऱ्या रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. रानभाज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्याला आजारापासून दूर ठेवत असल्यामुळे नागरिकांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन आमदार डॉ.देवराव होळी यांनी केले.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन कृषि चिकित्सालय, शासकिय रोपवाटीका, सोनापूर गडचिरोली येथे शुक्रवारी केले होते. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ.होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, पशुसंवर्धन उपायुक्त घाडगे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संदीप कऱ्हाळे, नाबार्डचे पौनीकर, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना राऊत, विषय विशेषज्ञ सुचित लाकडे, प्रगतशिल महिला शेतकरी प्रतिभा चौधरी, भालचंद्र ठाकुर, चंद्रशेखर भडांगे, शेतकरी गटाचे सभासद, महिला शेतकरी व महिला बचत गटांच्या सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बसवराज मस्तोळी यांनी रानभाज्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यावर मार्गदर्शन केले. डॉ.संदीप कऱ्हाळे यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व याविषयी सविस्तर माहिती दिली. सुचित लाकडे यांनी रानभाज्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये रानभाज्यांची ओळख, महत्व, आरोग्यास होणारे फायदे, उपयोग, गुणधर्म या विषयी सविस्तर माहिती दिली.
दिनांक 9 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान तालुकास्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी / महिला शेतकरी , शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी सहभाग घेण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालकांनी केले. तसेच तालुकास्तरावर रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून सदर स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस रु.2001, द्वितीय रु.1501, तृतीय रु.1001 देण्यात येणार आहे. बक्षीसासाठी किमान 10 स्पर्धक व किमान 5 पाककृती आणने आवश्यक आहे.
रानभाजी महोत्सवाचे औचित्य साधुन रानभाजी माहिती पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक डॉ.अभिजीत कापगते यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरज पाटील, हेंमत आंबेडारे, हेमंतकुमार उंदिरवाडे, बालू गायकवाड, किशोर कांबळे, लखन माटे, गोकुल मुनघाटे व अरूण कोटपल्लीवार आदींनी सहकार्य केले.