गडचिरोली : महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते तथा संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. नवीन कार्यकारीणी संस्थेला यशोशिखरावर नेण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करेल, असा आशावाद पोरेड्डीवार यांनी या निवडीनंतर व्यक्त केला.
सुधाताई शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. संस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीकरीता दि.31 जुलै 2024 रोजी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये इतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सचिव पदावर प्रशांत शांताराम पोटदुखे यांना कायम ठेवण्यात आले. तर कोषाध्यक्ष म्हणून संदीप गड्डमवार आणि उपाध्यक्ष म्हणून सगुणा तलांडी यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी डॉ.किर्तीवर्धन दीक्षित यांना कायम ठेवण्यात आले आहे.
65 वर्षांपासून कार्यरत संस्था
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सदर अध्यक्षपद मिळण्यात सुरेश पोटदुखे यांचे मोठे योगदान असल्याचे यावेळी आवर्जुन म्हटले. सर्वोदय शिक्षण मंडळ ही संस्था मागील 65 वर्षापासून कार्यरत असून सदर संस्थेचे कार्यक्षेत्र विदर्भात विस्तारलेले आहे. अशा या संस्थेच्या अध्यक्षपदावर माझी सर्वानुमते निवड होणे हे आनंददायी आहे, असे सांगत नविन कार्यकारीणी संस्थेला यशोशिखरावर नेण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करेल, असा आशावाद अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.
विदर्भात विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये
सर्वोदय शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना 1959 मध्ये झाली. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री स्व.शांताराम पोटदुखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र विदर्भात असून या संस्थेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात अभियांत्रीकी महाविद्यालय, विधी महाविद्यालय व शासनमान्य विविध अभ्यासक्रमांच्या शाळा, महाविद्यालयांचा समावेश आहे. पोरेड्डीवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने संस्थेव्दारे संचालित विदर्भातील सर्वच महाविद्यालय, शाळांमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.